अहमदनगर : गोळीबार करणाऱ्या प्राथमिक शिक्षकावर बडतर्फीची कारवाई होणार

अहमदनगर/प्रशांत झावरे :- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गुंडेगाव येथे दोन दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षकाने स्वतःच्या सख्ख्या भावावर गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली असून आरोपी शिक्षक उद्धव मरकड याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा व शिक्षण सभापती राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत यावर निर्णय झाला. या प्रकाराने शिक्षण विभाग बदनाम होत असल्याने व यामुळे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला जात असून सदर कृत्य हे अमानवी असून भविष्यात कोणत्याही शिक्षकाकडून असे कृत्य होऊ नये यासाठी उद्धव मरकड याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय झाला असल्याचे घुले यांनी सांगितले. या बैठकीला शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे, राहुल झावरे, मिलिंद कानवडे, उज्वला ठुबे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, लक्ष्मण पोले, सुनंदा वाखारे उपस्थित होते.

तसेच या बैठकीत शिष्यवृत्ती संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व शाळांना विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्यास सांगितले होते व तशा सूचना देऊनही ज्या मुख्याध्यापकांनी सदर सूचनांचे पालन केले नाही त्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या शाळांचे खोल्यांचे बांधकाम रखडलेले आहे त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर व दक्षिण विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर या बैठकीत शिक्षकांकडे असणारा अशैक्षणिक बोजा कमी करण्यात यावा, त्यांच्याकडील पोषण आहार बारदान मोजण्याचे काम काढण्यात यावे, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना स्वतंत्र वाहने आवश्यक आहेत. याचबरोबर ग्रामविकास विभागाकडे कामांबाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्याला किती यश मिळाले, तसेच प्रलंबित प्रश्नाबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे याचबरोबर अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

Gadgil