फडणवीस पोलखोल यात्रेवरून कॉंग्रेसमध्ये मतभेद ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रा तर आता कॉंग्रेसचे नाना पटोले हे ‘फडवणीस पोलखोल’ यात्रा काढणार आहेत.

परंतू या यात्रेवरून कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याचं चित्र आहे. या यात्रेचे आयोजन करताना पटोले यांनी वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याची सूत्रांची  माहिती आहे. नाना पटोले काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करणार आहेत.

दरम्यान याविषयी पटोले यांना विचारले असता ‘पोलखोल यात्रेवरून पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं. तारखांची थोडी जुळवाजुळव सुरु होती, त्यामुळे यात्रेची तारीख पुढे ढकलण्यात आली. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत या यात्रेबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे याबाबत नाराजीचा प्रश्नच नाही, असं नाना पटोलेंचं म्हणणे आहे.

दरम्यान, नाना पटोले हे वारंवार भाजपवर टीका करत आहेत. आता त्यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर म्हणून विदर्भात फडणवीस पोलखोल यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत ते विदर्भात जिथे मुख्यमंत्री गेले तिथे जाऊन फडवणीस सरकारने जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली ते सांगणार आहेत.