कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती देण्याचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : कोरोनामुळे आई-वडील मृत्युमुखी पडल्याने अनाथ झालेल्या मुलांसंदर्भात माहिती देण्याचे निर्देश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने(एनसीपीसीआर) राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिले. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती संकलित करण्यासाठी एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियंका कानूनगो यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.

कोरोनाबाधित आई-वडील मृत्युमुखी पडल्याने अनाथ झालेल्या मुलांसंदर्भात अनेक खासगी संघटनांकडून जाहिराती देण्यात येत असल्याची माहिती आयोगाकडे प्राप्त झाल्याचे या पत्रात म्हटले आहे. किशोर न्याय कायदा-२०१५ अंतर्गत अशा अनाथ मुलांच्या योग्य संगोपनासाठी व त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना जिल्ह्याच्या बाल संरक्षण प्रशासनाच्या समक्ष हजर करण्यात यावे किंवा त्यांच्या संदर्भात माहिती देण्याचे निर्देश कानूनगो यांनी राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.