मेट्रो स्थानक की शिवसृष्टी निर्णयासाठी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पुणे – पुणे शहरातील कोथरूड येथे प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता मुंबई येथे बोलवण्यात आली आहे. कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरवठा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने ११ फेब्रुवारीला आंदोलन करणार आहे, असे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आज झालेल्या खास सभेत सांगितले होते.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे २८ एकर पाच गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिला आहे. मात्र, शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रो स्थानकाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो का शिवसृष्टी अथवा दोन्ही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीच तेथे मेट्रो स्थानक होणार हे निश्‍चित झाले आहे. असे असताना शिवसृष्टीही तेथे झाली पाहिजे असा आग्रह काही नगरसेवकांनी धरला होता. परंतु त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. मेट्रो स्थानक व्यतिरिक्त या ठिकाणी शिवसृष्टीही होऊ शकते, असा अहवाल महामेट्रोने दिला होता.

या बैठकीत मेट्रोसाठीच्या २८ एकर जागेवर काही भागात स्थानक तसेच काही भागात शिवसृष्टी, असे करणे शक्य आहे. याची तंत्रज्ञांमार्फत चाचपणी करण्याचे ठरले आहे. तसेच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, काही तंत्रज्ञ व महापालिका पदाधिकारी अशी संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचा निर्णयही त्यावेळी झाला. तसेच लांबणीवर पडलेल्या या विषयाला अखेर मुहूर्त लाभला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत या बाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.