राणेंच्या निवडीने युती तुटल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील ; केसरकरांचा हल्लाबोल

टीम महारष्ट्र देशा : आरएसएसच्या उच्च विचारधारेवर भाजप पक्ष चालतो. तरीही त्यांनी पक्षाच्या जाहीरनामा समितीत नारायण राणेंची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेली युती राणेंची निवड आणि अमित शहांच्या वक्तव्याने तुटल्यास त्याचे देशभर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजप आमदारांच्या उपस्थितीतच दिला.

सांगलीत मैत्रेयच्या ठेवीदारांच्या बैठकीसाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, भाजपने राणेंना राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यांची ताकद फक्त एका आमदाराची आहे आणि तो आमदारही काँग्रेसचा आहे. भाजपला आरएसएससारख्या संघटनेचे वैचारिक अधिष्ठान आहे. संघटनेची विचारधारा घेऊन काम करणार्‍यांना भाजपमध्ये कामाची संधी दिली जाते. मात्र राणे यांची जाहीरनामा समितीवर निवड कोणत्या निकषाने केली, हे कोडेच आहे. राणेंचा सलग दोनवेळा शिवसेनेनेच पराभव केला आहे. तरीही त्यांना अशी पदे कशी दिली जातात, असा प्रतिप्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

भाजप-सेनेच्या युतीची चर्चा सुरू होताच राणे भाजपपासून दूर जात असल्याची चर्चा होती. आता थेट त्यांना जाहीरनामा समितीवर घेतल्याने युती झाली तरी कोकणपुरते तरी युतीचे भवितव्य अधांतरी झाले आहे, असेही ते म्हणाले.