fbpx

‘कुस्ती ठरवून व्यायाम करत नाही, जो कोणी विरोधात असेल त्याच्याशी लढायला तयार’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आ. दिलीप सोपल यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत दिलीप सोपल यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी दिलीप सोपल यांनी पक्षांतरा मागची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी दिलीप सोपल म्हणाले की, सर्व सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाण्याचा आग्रह होता. विरोधक कोणत्याही एका पक्षात स्थिर न राहता सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम करत आले आहेत. त्यामुळे सर्वांचा शिवसेनेत जाण्याचा आग्रह असल्याने मला निर्णय घेणे भाग पडले. राज्यात युती आहे का नाही याचा विचार न करता शिवसेनेत प्रवेश करत आहे. कुस्ती ठरवून व्यायाम करत नाही, जो कोणी विरोधात असेल त्याच्याशी लढायला तयार असल्याचं सोपल यावेळी म्हणाले. मला कोणाबद्दल तक्रार नाही, पवार साहेबां विषयी कोणताही राग नाही. पवार साहेबांसोबत अनेक वर्षे काम केले. त्यांच्याविषयीचा आदरभाव कमी झालेला नाही, असेही ते म्हणाले.

दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशावरून बार्शीचे निष्ठावान शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र दिलीप सोपल यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माझ्या पक्ष प्रवेशावरून आंधळकर नाराज नाहीत. त्यांनी माझ्या शिवसेनेत येण्याचं स्वागत केलं आहे. त्यांचे माझे संबंध कधीही टोकाला गेलेले नाहीत, असे सोपल म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखलं जातं. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे. गेल्या महिनाभरापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर तीनवेळा मुहूर्त टळल्यानंतर आता त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोपल राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला धक्का मानला जात आहे.