fbpx

बार्शीत राष्ट्रवादीची खेळी, शिवसेनेत जाणाऱ्या आ. सोपलां विरुद्ध बाळराजे पाटलांना मैदानात उतरवणार ?

टीम महाराष्ट्र देशा : बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पुढील आठवड्यात सोपल यांचा प्रवेश होणार असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे सोपल यांनी राष्ट्रवादी सोडल्यास त्यांना लढत देण्यासाठी मोहोळचे विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना मैदानात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीला धक्का देणारा आहे. सहावेळा आमदार राहिलेले सोपल शिवसेनेत गेल्यास पक्षाला फटका बसणार हे निश्चित. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. बार्शीमधून माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांना लढवण्याची चाचपणी केली जात आहे. सोपल विरुद्ध राऊत या पारंपरिक लढतीमध्ये पाटलांची एन्ट्री सोपल यांच्यासाठी धोक्याची ठरू शकते.

बार्शी व मोहोळ मतदारसंघत जवळ आहेत. 2008 च्या परिसीमनपूर्वी आज बार्शीमध्ये असणारी 70 – 75 गावे मोहोळ मतदारसंघात होती. या गावांमध्ये पाटील कुटुंबाला मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे सोपल यांनी शिवसेना प्रवेश केल्यास त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी बाळराजे पाटील यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. दरम्यान, सोपल व पाटील कुटुंबात असणारे सख्य पाहता ही लढत टाळण्यासाठी समर्थकांकडून प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, वैराग भागातील बडे प्रस्थ असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर यांचे नाव देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या