fbpx

आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो; सोपलांची डरकाळी

Dilip Sopal

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली आहे. तसेच सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. त्यामुळे या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

माझा जनतेशी कायम संवाद सुरू असतो. हा संवाद चार पिढ्यांबरोबर सुरु आहे. माझ्या डोक्यातील संभ्रम मला अवस्थ करू लागला आहे. तालुका हेच माझे कुटुंब झाले आहे. ज्यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळी लोकांत संताप निर्माण होऊन मला अपक्ष आमदार केले. २०१४ च्या लाटेतही मला निवडून दिले. आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो. तुमचा प्रतिसाद पाहून एक निर्णय ठामपणे घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केले.

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावलेली महत्त्वाची बैठक टाळून आ. सोपल यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला व त्यात आपली भूमिका विशद केली. त्यामुळे ते राष्ट्रवादीला जोरदार धक्का देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.