लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिलीप सोपल आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात खलबते

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद आणि माढा लोकसभेच्या मतदार संघासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये बार्शी येथे सोपल यांच्या निवास्थानी खलबते झाल्याची माहिती मिळत आहे.

माढा लोकसभेला खुद्द मोहिते पाटील यांनी गटा-तटाच्या राजकारणाला कंटाळून शरद पवार यांना तुम्हीच स्वतः माढा लोकसभा मतदार संघातून २००९ प्रमाणे पुन्हा उभे राहावे अशी मागणी केली आहे. त्यासोबतच दस्तरखुद्द शरद पवारांनी पुढील दोन दिवसात याबाबत निर्णय घे असे सांगितले आहे. त्यामुळे पवारांच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे.

तसेच उस्मानाबाद लोकसभेला आमदार दिलीप सोपल यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे लोकसभा की विधानसभा हा याबाबत सोपल आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सोपल हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत, परंतु वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावाची चर्चा चालू असल्याचे कळते आहे. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये खलबते झाली असल्याचे कळते आहे.

उस्मानाबाद आणि माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी-काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे काहीही झाले तरी यावेळी हे दोन्ही लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आले पाहिजे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेते मंडळीनी जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे सध्यातरी दिसत आहे.