शिवसेनेचा आमदार व्हावा म्हणूनच मोहितेंवर गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्‍यात शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा, मात्र याठिकाणी राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते निवडून येऊ शकतात, म्हणून त्यांच्यावर एक वर्षाने खोटा गुन्हा दाखल केला आहे. हे युती सरकारने कुभांड रचले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, याची कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (दि. 11) चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निषेध नोंदविला.

तसेच खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी खोटे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे दिले.

काय म्हंटल आहे निवेदनात ?

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण राज्यभर शांततेने आंदोलन झाले. त्याचे फलश्रुत म्हणून आरक्षण मिळाले; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले व शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले. या नैराश्‍यातून आढळराव व आमदार सुरेश गोरे यांनी जाणीवपूर्वक दबावतंत्र वापरून दिलीप मोहिते पाटील यांच्यावर इतक्‍या दिवसानंतर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात चाकण येथे झालेल्या दंगल व जाळपोळ याच्याशी दिलीप मोहिते यांचा काडीमात्र संबंध नसताना सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे, हे निषेधार्थ आहे. तरी दिलीप मोहिते यांच्यावर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. मराठा क्रांती मोर्चा आंदोलन अतिशय शांततेत पार पडल्यानंतर प्रत्यक्ष आंदोलनकर्ते कोणीही हजर नसताना जी जाळपोळ झाली, त्याचा सकल मराठा समाज व माजी आमदार मोहिते यांचा काहीही संबंध नसताना देखील पराभूत खासदार व विद्यमान आमदार त्यांनी षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले.