… तेव्हा भुजबळांच्या मुद्द्यावर शरद पवार गप्प का होते ?- कांबळे

स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी हि केवळ राजकारणासाठी पुढे केली जात आहे.

पुणे- जेव्हा राष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत होती आणि छगन भुजबळांच्या बाबतीत हे सगळं घडत होतं तेव्हा शरद पवार गप्प का होते असा थेट सवाल सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विचारला आहे. मी मागे छगन भुजबळांच्या विषयी बोललो तेव्हा माझ्यावर टीका करण्यात आली याची देखील त्यांनी आठवण करून दिली. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना कांबळे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.

छगन भुजबळांचे काही बरवाईट झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हीच जबादार असाल म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच पत्र लिहिले आहे. यामध्ये भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करत त्यांना योग्य उपचार देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.या पार्श्वभूमीवर दिलीप कांबळे यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी हि केवळ राजकारणासाठी पुढे करण्यात येत आहे- कांबळे

काल नाशिकमध्ये झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या उत्तर महाराष्ट्रातील समारोप सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी सुरु असलेल्या लढ्याला राष्ट्रवादीचा पाठींबा जाहीर केला होता तसेच शरद पवार याच विषयासाठी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं देखील जाहीर केलं होत. यावर कांबळे यांना प्रश्न विचारला असता स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी हि केवळ राजकारणासाठी पुढे केली जात असून या पाठीमागे दुसरे काहीच नाही असा टोला देखील कांबळे यांनी राष्ट्रवादीला लगावला .