दिलीप गांधी यांचे पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्र; मंदिरांसह व्यावसायिकांचे निर्बंध उठविण्याची केली मागणी

hasan mushrif

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मंदिरे बंद असणे हा राज्यातील भाविकांवर अन्याय आहे. महाराष्ट्रातले लॉकडाऊन उठले असून देखील तीर्थक्षेत्रे व मंदिरे बंद आहेत. या सरकारने मंदिरांची दारे खुली करावीत. भजन व प्रवचनाला परवानगी द्यावी.

तसेच, राज्यातील मंदिरासोबतच, मस्जिद, चर्च, गुरूद्वार उघडावे अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

माजी खासदार दिलीप गांधी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण देशात आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील मंदिरे बंद ठेवणे चुकीचे असून त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असून तो महाराष्ट्रातही कमी होत आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, सफाई कर्मचारी व इतर सामाजिक संस्था रात्रंदिवस या कठीण काळात मेहनत घेत आहेत.

तसेच लॉकडाऊनमुळे आधीच हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल झाले आहेत. सध्या संपूर्ण राज्यामध्ये अनलॉक झालेले असून संपूर्णत: निर्बंध उठवलेले आहे. परंतू अहमदनगर जिल्ह्यामध्ये अद्याप पर्यत व्यवसायिकांना व्यवसाय करण्याकरिता अजूनही निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व्यावसायिकांना लादण्यात आलेल्या निर्बंधाची आता आवश्यकता भासत नाही.

तरी संपूर्णत: निर्बंध काढण्यात यावे जेणेकरून व्यावसायिकांना सणासुदीच्या निमित्ताने चांगल्याप्रकारे व्यवसाय करता येईल. त्याचप्रमाणे इतर राज्यातील धार्मिक मंदिरे सुरू असुन आपण मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरूद्वार महाराष्ट्रातही उघडावेत, अशी विनंती मा.खा.गांधी यांनी पत्रात केली आहे. सदर पत्राची प्रत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:-