fbpx

कॉंग्रेसमध्ये यादवी, राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

rahul_gandhi

भोपाळ – पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील अंतर्गत मतभेद हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड पक्षासाठी डोकेदुखी ठरत असून, उमेदवारांच्या निवडीसाठी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच पक्षाचे मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात खडाजंगी उडाली.

राहुल यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु असताना हा प्रकार घडला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. तिकिट वाटप आणि उमेदवारांच्या निवडीवरुन ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांच्यात जोरदार वाद झाला.वाद एवढा टोकाला गेला की पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये तडजोड शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी हा वाद सोडवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली .

अशोक गेहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल हे काँग्रेसचे तीन ज्येष्ठ नेते वाद सोडवण्यासाठी रात्री अडीज वाजेपर्यंत चर्चा करत होते. पक्षाच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधला हा वाद पाहून राहुल गांधी सुद्धा संतापले असे सूत्रांनी सांगितले.