ग्रामपंचायतीमध्ये एप्रिलपासून सुरू होणार डिजीटल कामकाज

Digital GramPanchayat

सातारा  : 1 एप्रिलपासून जिल्हा व ग्रामपंचायतीत हाताने लिहिले जाणारे रेकॉर्ड बंद होऊन संगणकीकृत कामकाज सुरू होणार आहे. यापुढे ग्रामपंचायतीमधून 400 हून अधिक कामकाज चालणार आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी उत्पन्नाचा अंदाज घेऊन विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून लोकसहभागातून परिपुर्ण नियोजनाचा आराखडा तयार करावा करावे.

वेगवेगळया योजना, उपक्रम राबवून गावाचा सर्वागिण लौकिक वाढविण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांनी सर्वोत्तम योगदान द्यावे, असे आवाहन उप मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सातारा जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंंद्रात देगाव, वडूथ, आरफळ, बोरखळ, मालगाव, आसगाव, म्हसवे, क्षेत्रमाहुली, आरळे, मर्ढे, रेनावळे, खावली, कोंढवली या गावातील सर्व नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसाठी 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसांची क्षमता बांधणी प्रषिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.

समारोप प्रसंगी उप मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ग्रामपंचायतीचे प्रभावी कामकाज करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले.विकासाचा लौकिक असलेल्या काळदरी (पुरंदर) गावचे आदर्ष सरपंच अंकुष परखंडे यांनी, गावाच्या विकासासाठी ग्रामपंचातीच्या पदाधिकार्‍यांनी जबाबदारी घेऊन वेळ दिल्यास चांगले काम करता येते. प्रभावी विकास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा नियोजन आणि अंमलबजावणीत सहभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून काळदरीची यशोगाथा सांगून सर्वाना प्रभावीत केले.

पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सांवत यांनी, लिंब गावचे सरपंच म्हणून उत्तम काम केल्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पून्हा पंचायत समितीचे उपसभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली.राजकारण विरहित आणि लोकांच्यात सतत मिसळून राहिल्यास लोकसहभाग मिळतो. जास्तीत जास्त वैयक्तिक आणि सार्वजनिक शासकिय गावात राबविण्यासाठी सातत्याने योगदान द्यावे, असे आवाहन केले.