तुम्हाला ही तीन महिन्यात करोडपती बनायचं ? मग हे वाचाच…

वेबटीम : तीन महिन्यात करोडपती होणार असा दावा करणाऱ्या एका ज्वेलर्सला असा दावा करणं चांगलच महागात पडलं आहे .ग्राहकाला विकलेल्या रत्नाच्या किमतीची परतफेड न केल्यामुळे ग्राहक न्यायालयाने ३.२ लाखांचा दंड ठोठावला आहे.
करोडपती होण्याची इच्छा असलेल्या कवडू खंडाळे (८०) यांनी २०१३ मध्ये दादर पूर्वेकडील सुवर्णस्पर्श या ग्रहांचे खडे विकणाऱ्या ज्वेलर्सकडून नीलम हा खडा विकत घेतला होता. त्यानंतर या दुकानातून कुमारी प्राची आणि शशिकांत पंड्या या दोन ज्योतिषांनी त्यांना नीलम ऐवजी माणिक आणि पुष्कराज वापरण्याविषयी सांगितलं. त्यानुसार खंडाळे यांनी नीलम परत करून २.९ लाखांचे माणिक आणि पुष्कराज हे दोन खडे विकत घेतले.

रत्न परिधान केल्यानंतर ३० दिवसांत फरक पडेल, आणि तुम्ही तीन महिन्यात करोडपती बनणार असा दावा या ज्योतिषांनी केला होता. फरक पडला नाही तर सर्व पैसे परत करण्याची खात्रीही या दुकानाने दिली होती.परंतु, रत्न धारण करूनही काहीच फरक न पडल्याने खंडाळे यांनी दोन्ही रत्ने परत केली आणि दुकानाकडे आपले पैसे परत मागितले. मात्र, सुवर्णस्पर्शने खंडाळे यांचे पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे परत मिळवण्यासाठी खंडाळे यांनी थेट ग्राहक न्यायालयाकडे सदर दुकानाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सुनावणी करताना ग्राहक न्यायालयाने खंडाळे यांच्या बाजूने निकाल दिला.

निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलं आहे?
सुवर्णस्पर्श या ज्वेलर्सने खंडाळे यांना ही दोन रत्ने त्यांच्यासाठी भाग्यकारक असून ३० दिवसांमध्ये इच्छापूर्ती होईल, तसे न झाल्यास पैसे परत करू, असा दावा केला होता. पण, असं काहीही घडलं नाही. त्यामुळे रत्न विकण्याच्या नावाखाली ग्राहकाची दिशाभूल करण्यात आली. सुवर्णस्पर्श या दुकानाला खंडाळे यांनी भरलेली सर्व रक्कम, रक्कम भरल्या दिवसापासून ९ टक्के दराने व्याजासहित परत करावी, याखेरीज २५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि दावा दाखल करण्यासाठी लागलेली रक्कम म्हणून ५ हजार रुपये भरपाई करण्याचे आदेश न्यायालयाने सुवर्णस्पर्शला दिले आहेत.