हुकूमशाही? पूर्वकल्पना न देता सलून दुकानदारांचे सामान रस्त्यावर फेकले

औरंगाबाद : ६० वर्षापासून एकाच ठिकाणी वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या सलून चालकाचे सामान दुकानातुन फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पानदरीबा परिसरात मंगळवारी (दि.४) घडला आहे. ज्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करण्यात येत होता. तेथील सामान रस्त्यावर फेकून दिल्याने आता काय करावे असा प्रश्न सलून चालकापुढे निर्माण झाला आहे. दरम्यान, न्याय मिळण्यासाठी पोलिसांकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती सलून चालकाने केली आहे.

देविदास आसाराम जाधव यांचे पानदरीबा परिसरातील ६० वर्षांपासून वडिलोपार्जित मॉडर्न हेयर कटिंग सलून दुकान आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने हे दुकान महिन्याभरापासून बंद आहे. हे दुकान खाली करण्याचा तगादा जागा मालक सुनंदा चंद्रकांत लकडे, दीपा सतीश लकडे, सतीश चंद्रकांत लकडे यांनी जाधव यांच्याकडे केला होता. शिवाय दुकान खाली न केल्यास मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जाधव यांनी दुकान खाली करण्यास मुदत मागितली होती.

लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने एक महिन्याचे दुकान भाडे थकले होते. यातच लकडे कुटुंबीयांनी जाधव यांच्या दुकानातील सर्व सामान रस्त्यावर फेकून दिला. मंगळवारी (दि.४) सकाळी इतरांकडून ही बाब जाधव यांना कळताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानाला दुसरे कुलूप लावून जागा मालक तिथे बसलेले होते.

पूर्वकल्पना न देता सामान फेकल्याबद्दल जाधव यांनी विचारणा केल्यानंतर लकडे कुटुंबीयांनी जागा आमची आहे? तिथे आम्ही काहीही करू शकतो. तुम्हाला काय करायचे करून घ्या. आज तुमचे सामान फेकले उद्या तुमचे काहीही करू अशी धमकी दिली. अचानक हा प्रकार घडल्याने जाधव कुटुंब हतबल झाले. न्याय मिळावा, दुकानाचा ताबा परत मिळावा या आशेने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली.

संपूर्ण कुटुंब दिवसभर रस्त्यावर बसून
रस्त्यावर फेकून दिलेला सामान पाहून जाधव कुटुंबीयांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पोलीसांकडे तक्रार केल्याने न्याय मिळेल या आशेने ते सामान जिथे पडलेला होता तिथेच बसून होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली नव्हती. दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत जागेवरून हटणार नाही असा पवित्रा जाधव कुटुंबीयांनी घेतला आहे. न्याय मिळत नसेल तर ‘ आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय पर्याय उरला नाही’ असे प्रसार माध्यमांशी बोलताना जाधव यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या