सशक्त लोकशाहीसाठी  संवाद महत्वाचा -सी.विद्यासागर राव

mann ki baat
पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे चांगले साधन आहे. सशक्त लोकशाहीसाठी हा संवाद महत्वाचा असून याच धर्तीवर आधारीत असणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रमही स्तुत्य असल्याचे गौरोद्गार राज्यपाल सी.विद्यासागर रावयांनी आज काढले.
येथील बालगंधर्व रंगमंदीरात नवभारत निर्मिती संकल्प सिध्दी व भारतीय विचार साधना प्रकाशन पुणेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याआकाशवाणीवरील प्रसारीत भाषणा वर आधारीत “मन की बात” च्या मराठी अनुवादीत पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक,खासदार विनय सहस्रबुध्दे, खासदार अनिल शिरोळे, नवभारत निर्मिती संकल्प सिध्दीचे समन्वयक योगेश गोगावले, भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष किशोर शशितल, कार्यवाह राजन ढवळीकर उपस्थित होते.
राज्यपाल सी.विद्यासागर राव म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम देशातील सर्व सामान्य जनतेशी साधलेला संवाद आहे. या कार्यक्रमात सर्व सामान्य जनतेच्या आशा, आकांक्षांचे प्रतिबिंब असते. संवादा शिवाय लोकाशाही बळकट होवू शकत नाही. सशक्त लोकशाही साठी मन की बात सारखा संवादाचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सामान्य जनता आणि शासन यांच्यातील सेतूचे काम या कार्यक्रमामुळे होत आहे. देशाच्या नवनिर्मितीसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला कामाची प्रेरणा मिळते. मन की बात प्रमाणेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेत असलेला “ मी मुख्यमंत्री बोलतोय” हा उपक्रमही शासनाच्या आणि शासनकर्त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिक आहे. हा कार्यक्रम स्तुत्य आहे. मन की बात हा कार्यक्रम मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पुस्तक स्वरूपा अनुवादीत करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे प्रधानमंत्र्यांचे विचार व्यापक स्वरूपात सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.