प्रेक्षकांच्या ध्यांनीं आणि मनी रुजणारा “ध्यानीमनी”

महेश मांजरेकरांची २०१७ मधील पहिली निर्मिती !

महेश मांजरेकर निर्मित ‘नटसम्राट’ चित्रपटाने २०१६ ची सुरुवातच जबरदस्त केली होती आणि आताही महेश मांजरेकर निर्मित ‘ध्यानीमनी’ या १० फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट जबरदस्त उत्सुकता निर्माण  करण्यात यशस्वी झाला  आहे.  संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं विशेष लक्ष आणि हिंदी सिनेसृष्टीची उत्सुकता  या चित्रपटाकडे लागून राहिली आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी, मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक देखील करत आहेत. बिग बी आणि सलमान खाननं ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाच्या ट्रेलरला मनापासून दाद दिली असून, ट्विटर आणि फेसबुकवरून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच ‘ध्यानीमनीचा’ अत्यंत कुतूहलपूर्ण ट्रेलरही त्यांनी ट्विट केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रेक्षकांना कायमच नाविन्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या महेश मांजरेकरांची ही निर्मिती असून महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ‘ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसची ही कलाकृती आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं अत्यंत कल्पक असं  दिग्दर्शन केलं आहे.  प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लिहिले असून संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या अत्यंत ताकदीच्या अभिनयानं चित्रपटातील आपल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अश्विनी भावे ह्या कसलेल्या अभिनेत्रीचा अभिनय बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

चित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसार पद्धती देखील बदलत चाललेल्या दिसून येतात. हा सिनेमा “बघू नका” अशी विनंती सध्या अनेक दिग्गज कलाकार करत आहेत. कलाकारांच्या अशा आग्रही विनवण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. ठाम, गंभीर आणि रहस्यमय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर व्हिडिओत व्यक्त होताना आढळून येत आहेत. या सिनेमा बद्दल ख्यातनाम हिंदी सिनेतारे, अमिताभ बच्चन व सलमान खान यांनी सुद्धा ‘हा चित्रपट बघू नका’ असे ट्विट केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील सचिन खेडेकर, सुनील बर्वे, भाऊ कदम, अमृता खानविलकर, संजय जाधव, संदीप पाठक, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, आकाश ठोसर तसेच पूजा सावंत हे देखील चित्रपट बघू नका असे आग्रहाने सांगत आहेत. चित्रपटाप्रतीच्या या नकारात्मक भूमिकेने सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. माणसाचा स्वभावच असतो की एखादी गोष्ट करू नका किंवा बघू नका सांगितल्यावर ती मुद्दाम करावीशीच वाटते. इथे निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती विषयी असलेला आत्मविश्वास तसेच त्यांनी केलेले धाडस यातून दिसून येते. या धाडसामुळे सोशल मीडियात या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू असून १० फेब्रुवारीला, एक अत्यंत वेगळा विषय  घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like
Comments
Loading...