भाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा?

टीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकत भाजप आमदार अनिल गोटे यांनी देखील आता राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे.

आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करीत पक्ष सोडला. गोटे यांनी अद्याप तसा पवित्रा घेतलेला नाही. मात्र धुळ्याच्या स्थानिक राजकारणात पक्षाकडूनच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.

धुळे महापालिका निवडणुकीत आ. गोटे विरुद्ध जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे.भाजपने कारवाई केल्यास लोकसंग्राम पक्षामार्फत गोटे आपले उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. भाजपला आणि प्रामुख्याने तीन मंत्र्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यास काय चित्र असेल, याचे अंदाज बांधले जात आहेत.

महापालिकेच्या निकालावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे समीकरण अवलंबून असेल. धुळे शहर विधानसभेच्या जागेवर डॉ. भामरे यांचा डोळा असल्याचा आरोप गोटे यांनी आधीही केला आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा उठवून महापालिकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. गोटे यांनी सध्या घेतलेली भूमिका राष्ट्रवादीला मोठा फायदा करून देणारी ठरू शकते असा देखील अंदाज वर्तविण्यात येत आहे.