fbpx

धोनी धावचीत झाल्याचा धक्का न पचवता आल्याने चाहत्याचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा- आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सेमीफायनल जिंकण्याच्या आशा जिवंत केल्या खऱ्या, पण जडेजानंतर अत्यंत महत्त्वाच्या क्षणी धोनी रन आउट झाला आणि टीम इंडियाही वर्ल्डकपमधून आउट झाली. भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव झाला.

भारताला जिंकण्यासाठी १० चेंडूत २४ धावांची गरज होती. धोनी स्ट्राइकवर होता. दुसऱ्या बाजूला भुवनेश्वर कुमार होता. धोनीने फर्ग्युसनच्या बाउंसरवर फटका लगावला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेत असताना गुप्टिलचा थ्रो थेट स्टम्पवर लागला. धोनी रन आउट झाला अन् चाहत्यांचे चेहरेच पडले.

दरम्यान,धोनी धावचीत झाल्याचा धक्का न पचवता आल्याने कोलकात्यातील एका क्रिकेटच्या चाहत्याचा मृत्यू झाला आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीकांत मैती असं या चाहत्याचं नाव आहे. कोलकात्यात सायकलचं दुकान असणारे मैती हे बुधवारी मोबाईलवर हा सामना पाहत होते. धोनी बाद झाल्याचा धक्का श्रीकांत पचवू शकले नाहीत आणि जमिनीवर कोसळले. काही लोकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.