fbpx

फलंदाजी दरम्यान धोनीनेचं दिल्या बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांना सूचना

टीम महाराष्ट्र देशा : लंडन येथे झालेल्या भारत वि. बांग्लादेश या भारताच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर तब्बल ९५ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात के एल राहुल आणि एम एस धोनी यांनी शतकी खेळी खेळत बांगलादेश समोर ३५९ धावांचा आव्हान उभे केले.

या सामन्यात एम एस धोनीच्या शतकी खेळीने अनेक क्रिकेट प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले. या सामन्यात धोनीने ७८ चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ११३  धावांची शतकी खेळी साकारली. तर धोनीला साथ देताना के एल राहुल याने देखील ९९ चेंडूंत १२ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १०८  धावांची खेळी केली.

तसेच या सामन्यात धोनीच्या नेतृत्व गुणांची चुणूक देखील पाहिला मिळाली. चक्क धोनीने फलंदाजी करताना बांगलादेशची फिल्डिंग लावली. झाल अस की, फलंदाजीवेळी धोनीच्या लक्षात आले की बांगलादेशने चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केले आहे. तेव्हा त्याने गोलंदाजाला क्षेत्ररक्षणात बदल करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे बांगलादेशने धोनीने सांगितल्याप्रमाणे बदलही केला.

धोनी कर्णधारपदावरून बाजूला झाला असला तरी त्याच्यातले नेतृत्वगुण अद्याप कमी झालेले नाहीत. अनेकदा मैदानावर तो कर्णधार विराट कोहलीला देखील सल्ला देताना दिसतो. बऱ्याचदा स्टंपमागे उभा असलेला धोनी संघासाठी मार्गदर्शकाच्याच भूमिकेत पाहिला मिळतो