fbpx

ढोबळेंचा भाजप प्रवेश ; हिंदुत्ववाद्यांकडून सोशल मिडीयावर टीकेची झोड

सोलापूर – (सूर्यकांत आसबे ) – राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी जालना येथे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर मात्र ढोबळे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

ढोबळे यांनी काही महिन्यांपूर्वी जुळे सोलापुरातील आपल्या शिक्षण संस्थेत शीतल साठे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम ठेवला होता.हा कार्यक्रम सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवून साठे यांना नक्षलवादी समर्थक असल्याचा आरोप करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, या कार्यक्रमात गोंधळ होणार याची कुणकुण लागल्याने पोलीस बंदोबस्त असतानाही एबीव्हिपीने गोंधळ घालताच उपस्थित असलेले कार्यकर्ते व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.त्यानंतर हे प्रकरण विजापूर नाका पोलिसात गेले होते.

दरम्यान, आज ढोबळे यांना भाजप प्रवेश देताच एबीव्हिपी आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ढोबळे यांच्या नक्षल समर्थन करणाऱ्या कार्यक्रमाची चिरफाड करत ढोबळे यांच्यावर टीकेची झोड उठविली.ढोबळे यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या वॉरमुळे ढोबळे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्यासाठी आटापिटा करणाऱ्या नेत्याला मात्र हिंदुत्ववाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.