‘आम्ही ईडीच्या चौकशीचा धडाका लावला असता तर भाजपचा ‘भा’ पण शिल्लक राहिला नसता’

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीची नोटीस आली आहे. मुंबईतील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी राज यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडल्याने मनसे आक्रमक झाली आहे. तर राज ठाकरे यांना धाडण्यात आलेल्या नोटीसवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील भाजप सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली शिवस्वराज्य यात्रा आज पैठण येथे आली. यावेळी संत एकनाथांच्या भूमीत विरोधकांनी सत्ताधारी भाजप-सेना युतीला चांगलेचं खडे बोल सुनावले. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंच्या ईडी नोटीस वरून फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावली. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचा ‘भा’ पण शिल्लक ठेवला नसता.

दरम्यान राज ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात टाकले जात आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चाल आहे अशी प्रतिक्रिया मनसेकडून दिली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.