‘आरोग्य सुविधांचे धिंडवडे, तरीही भाजप अजयसिंह बिष्ट यांचा भावी पंतप्रधान म्हणून प्रचार करतेय’

prithviraj chavhan

मुंबई : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. तब्बल १२ हजार लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर जवळपास १०० मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच फिरोजाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद केल्या आहेत.

या प्रकारामुळे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट हे अगदी मूलभूत आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत आणि तरीही भाजप भावी पंतप्रधान म्हणून त्यांचा प्रचार करत आहे असे ट्विट चव्हाण यांनी केले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख चव्हाण यांनी त्यांच्या मुळ नावाने म्हणजे अजयसिंह बिष्ट असा केला आहे.

चव्हाण म्हणाले की, फिरोजाबादमध्ये १२ हजार लोक डेंग्यूने ग्रस्त आहेत आणि जवळपास १०० मुलांचा मृत्यू झाला आहे. हे धक्कादायक आहे. दुर्दैवाने मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट अगदी मूलभूत आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत. तरीही भाजप भावी पंतप्रधान म्हणून या लायकीचा प्रचार करत आहे.’

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यातील लोकांना डेंग्यूची लागण होत आहे. मथुरामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शेकडो लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाराणसीमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. डेंग्यूमुळे रुग्णांच्या प्लेटलेट्सं कमी होत आहेत. त्यामुळेच ब्लड बँकेत मोठी गर्दी होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून आरोग्य सेवांचा आढावा घेतला आहे. शेकडो मुलांवर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात आणि गावातही उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या