धीरज देशमुखजी, मतदारसंघातील प्रश्न सोडवलात, राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे काय?

लातूर : माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावर मतदार संघातील ग्रामपंचायती संदर्भात पोस्ट केलीय. यामध्ये त्यांनी वीजबिलापोटी महावितरणने पाणी पुरवठ्याचा खंडीत केलेला विद्युत पुरवठा त्यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरू झाल्याचा उल्लेख केलाय. धीरजजी, तुम्ही तुमच्या मतदार संघातील ग्रामपंचायतीसाठी तुमचा शब्द खर्ची घातला. त्याचा फायदाही झाला. मात्र, राज्यातील अशा अनेक ग्रामपंचायती आहेत. त्या गावातील नागरिकही पाण्यासाठी भटकंती करत आहेत. ही सर्वस्वी तुमची जबाबदारी नसली तरी, पक्षाचा एक नेता म्हणून आम्ही तुमच्या परिवाराकडे पाहतो. त्यामुळे पूर्ण राज्याचा विचार करून त्यासाठी विशेष धोरण ठरवण्याचा आग्रह तुम्ही करू शकला असता. तसे झाल्यास राज्यातील कोणत्याही मतदारसंघातील महिलेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

सध्या महावितरणने वीजबिल वसूली मोहिम सुरू केली आहे. यात सर्वात आधी बिचारा शेतकरी पिळला जातोय. त्यावर विरोधक आवाज उठवत असले तरी, त्यांचेही या मुद्याकडे हवे तसे लक्ष नाही. दुसरीकडे ग्रामपंचायत, नगर पालिका, नगर परिषद यांचे थकीत बिल वसूल करण्यासाठी महावितरण त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करत आहे. त्याचा फटका लातूर पालिकेलाही याच आठवड्यात बसला आहे. स्थानिक प्रशासन आणि महावितरण या दोघांच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकाला मात्र, पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सर्वसामान्यांच्या या प्रश्नावर ठरवल्यास शासन स्थरावर तोडगा काढणे काहीही अवघड नाही. त्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

त्यामुळे धीरजजी, आपण ज्या प्रमाणे आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायतीचा प्रश्न सोडवलात. त्याच प्रमाणे या राज्यातील नागरिक देखील आपल्या पक्षाचेच मतदार आहेत. सध्या राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आहे. त्यात सर्व राज्यासाठी आपण आपला शब्द खर्ची केल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होईल. आणि राज्यातील कोणत्याही महिलेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या