शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग; धर्मा पाटलांच्या कुटुंबियांना व्याजासह मोबदला देणार

धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या 199 हेक्टर जमिनीचे सात दिवसात फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. पाटील यांच्या मृत्यूनंतर सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात हजारो वेळा खेटे घातले पण पदरी निराशाच आली, अखेर धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता सरकारकडून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान धर्मा पाटील यांच्या तुलनेत दुसऱ्या शेतकऱ्याना जादा मोबदला कसा मिळाला याची देखील चौकशी करू. तसेच जमीन संपादनात चूक असेल तर व्याजासह अधिक मोबदला देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

You might also like
Comments
Loading...