fbpx

हाफ चड्डीची फुल्ल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येतेच असे नाही – धनंजय मुंडे

उरण :  राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील ( कोप्रोली नाका ) सभेस संबोधित केले. राज्यभर साठच्यावर सभा घेत सर्वाधिक लोकप्रियता मिळवणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वाच्याळताही वाढत चालली आहे. अहो, हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी ते उद्धव ठाकरेंवरही बरसले. तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवाल त्यांनी उध्वव ठाकरे यांना केला ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीका केली.

पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकास करणं हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. पवार साहेबांचे नातू व अजितदादांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे. त्यामुळेच उरण भागातून सर्वाधिक लीडने पार्थ पवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

अधर्माच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी श्रीकृष्णाने सुद्धा अर्जूनास साद घातली होती. मावळची लढाई जिंकण्यासाठी मोठ्या विश्वासाने पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. पार्थच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंदरालगत असलेल्या शहरांसारखाच उरण शहराचा विकास होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, प्रशांत पाटील, महेंद्र घरत, मेघनाथ तांडेल, भावना घाणेकर आदी उपस्थित होते.