भाजपच्या नेत्यांनी ‘तिकीट वंचित आघाडी’ करून मोदींना धडा शिकवावा : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई मतदार संघातून युतीकडून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करत मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनेक दिवस ईशान्य मुंबई मतदार संघाचा उमेदवार युतीकडून ठरत नव्हता पण अखेर किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबई मतदार संघाला मुकाव लागले आहे. मात्र त्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत भाजपच्या वंचित नेत्यांनी भाजप विरोधातचं आघाडी करावी असा सल्ला दिला आहे.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, शिवसेनेच्या हट्टापायी भाजपने किरीट सोमय्यांच्या स्वप्नांचा गळा दाबलाय. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या स्वप्ननांचाही भाजपने असाच चुराडा केलाय. ‘तिकीट वंचित आघाडी’च्या बॅनरखाली या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मोदींविरोधात आघाडी करावी आणि मोदींना धडा शिकवावा.

दरम्यान ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला मित्र पक्ष शिवसेनेचाच विरोध होता. त्यामुळे मित्रपक्षाची मन राखण्यासाठी भाजपने ईशान्य मुंबई मतदार संघातून किरीट सोमय्या यांचे तिकीट कापले आहे. मधल्या काळात युती मध्ये मतभेद असताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांवर चांगलेच तोंड सुख घेतले होते. त्यामुळे शिवसेनेने ईशान्य मुंबई मधून किरीट सोमय्या असतील तर आम्ही पाठिंंबा देणार नसल्याची भूमिका घेतली होती.