‘बसस्थानकाच्या श्रेयासाठी धनंजय मुंडेंचा आटापिटा’

munde

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सत्तेच्या काळात परळीसाठी आणलेल्या विविध कामांच्या निधीचे श्रेय घेण्याचा पालकमंत्री धनंजय मुंडेंचा आटापिटा अजूनही सुरूच आहे. परळी बसस्थानकासाठी पंकजा मुंडेंनी निधी मंजूर करून आणला आहे. त्याचेही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न पालकमंत्री करत असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केला आहे.

दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की, पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री असताना परळीतील विविध कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून आणला होता. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास, शहरातील रस्ते, राष्ट्रीय महामार्ग या सर्वांसाठी त्यांनी अतिशय तळमळीने प्रयत्न केले होते. परळी बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठीही त्यांनी ५ कोटी ४५ लाखाचा निधी मंजूर करून आणला. त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ मध्ये झाले होते. त्यानंतर आचारसंहिता लागली. पण प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली होती. आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच काम सुरू होणार आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्ता आल्यानंतर स्वतःच्या क्षमतेवर एक रुपयाचा देखील निधी सरकार कडून खेचून आणू शकले नाहीत. आता मतदारसंघात जी काही कामे सुरू आहेत, ती पंकजा मुंडे यांच्याच काळातील आहेत. पालकमंत्री मात्र आयत्या आलेल्या निधीवर डोळा ठेवून तो निधी आपणच आणल्याचे श्रेय घेत आहेत, परळी बसस्थानकाच्या कामाबाबतही त्यांनी अशाच आयत्या श्रेयाचा कित्ता गिरवला आहे अशी टीका लोहिया यांनी केली आहे.

IMP