विद्यापीठाच्या नामांतरासाठी धनगर कृती समितीचा सोमवारी मोर्चा

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यासाठी आणि एसटी वर्ग आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती धनगर आरक्षण कृती समितीने दिली. अहिल्यादेवी पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. शासकीय विश्रामगृह येथे समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. नगरसेवक चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, सभागृहनेते सुरेश पाटील, शैलेश पिसे, रघू कोळेकर, सुनील बंडगर आदी उपस्थित होते. सर्व बांधवांनी येत्या सोमवारी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. मोर्चा यशस्वितेसाठी बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीत जवळपास एक लाख रुपयांची देणगी जमा झाली. विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत महापालिकेने आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर आहे. मात्र विद्यापीठाच्या प्रशासनाने जातीयवादाचा रंग देण्याचा प्रकार चालवला आहे. कुलगुरू राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अारोप करीत महापालिका सभागृहात नेते सुरेश पाटील यांनी कुलगुरूंच्या निषेधाचा ठराव मांडला. सध्याचे सरकार आश्वासन देऊन घूमजाव करीत आहे. आरक्षण आणि विद्यापीठाच्या नामकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला आहे. तो शब्द त्यांनी पाळावा आणि अधिसूचना जारी करावी, अशी मागणी करण्यात आली.