fbpx

दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन लातूरला

अभिजित कटके

सांगली : प्राचीन काळापासून ‘भटका- वंचित’ असलेल्या धनगर समाजाचा आवाज जगाच्या कानाकोप-यात पोहोचवितानाच त्यांच्या व्यथा व वेदना साहित्याआधारे जगासमोर मांडणारे दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि. ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत लातूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी दिली. लातूर येथे होणा-या दुस-या धनगर साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी येथे आयोजित पत्रकार बैठकीत जयसिंग शेंडगे बोलत होते. धनगर साहित्य परिषदेचे पहिले साहित्य संमेलन गतवर्षी सोलापूर येथे झाले होते. हे साहित्य संमेलन केवळ धनगर समाजाचे नव्हे, तर इतर आदिवासी समाजाचेही प्रतिनिधीत्व करणारे आहे. या सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे साहित्य संमेलन आयोजित केले असल्याचे जयसिंग शेंडगे यांनी सांगितले. लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे हे दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मालेगाव महापालिका आयुक्त तथा ‘हुमान’ या आत्मकथेच्या लेखिका संगिता धायगुडे असून उदघाटक ज्येष्ठ साहित्यिक व रानकवी ना. धों. महानोर आहेत. समारोप सत्राचे अध्यक्षस्थान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक डॉ. कांचा इलय्या भूषविणार असून ज्येष्ठ साहित्यिक- विचारवंत संजय सोनवणी प्रमुख मार्गदर्शक आहेत. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता ग्रंथदिंडी व शोभायात्रेने या साहित्य संमेलनाची सुरूवात होणार आहे. रात्री नऊ वाजता मनोरंजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता उदघाटन होणार आहे.

त्यानंतर संपूर्ण दिवसभरात विविध विषयावर सहा परिसंवाद होणार आहेत. रात्री आठ वाजता कथाकथन, तर साडे आठ वाजता कवी संमेलन होईल. रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंतही विविध विषयावर परिसंवाद होणार आहेत. या साहित्य संमेलनास जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व खासदार डॉ. विकास महात्मे आदी उपस्थित राहणार असल्याचेही जयसिंग शेंडगे यांनी सांगितले.