धनगर आरक्षण : भाजप खासदारानेच केली महायुतीच्या वचननाम्याची होळी

blank

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला आहे. शासनाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन 2014 च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. परंतु चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अद्याप दिलेल्या आश्वासनाची पूर्तता युती शासनाने केली नाही. त्यामुळे आज महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत महायुतीच्या वचननाम्याची होळी केली.

मुलुंड विभागात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे खासदार पद्मश्री विकास महात्मे यांनी केले. धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणाच्या धनगर जमातीच्या सर्व मागण्या प्रलंबित आहेत. महायुतीने 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. अजूनही ते पूर्ण केले नाही. भाजपचा खासदार असलो तरी आधी मी धनगर आहे यासाठी हे आंदोलन आहे, असे खासदार महात्मे यावेळी म्हणाले.