fbpx

धनगर समाजाला मिळणार स्वतंत्र 10 हजार घरे – देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आदिवासीच्या योजना लागू करण्याचा निर्णय शनिवारी (दि. 2) घेतला. आदिवासी समाजाच्या योजनांना धक्का न लावता राज्यात 10 ठिकाणी  स्वतंत्र शासकीय आश्रमशाळा, प्रत्येक विभागात विध्यार्थी वसतीगृह, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, भूमिहीनांना जमीन खरेदीसाठी अर्थसाह्य, पहिल्या टप्प्यात 10 हजार घरकुले आदी महत्वपूर्ण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसाठी घोषित केल्या आहेत.
मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये धनगर आरक्षणावर बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंधारण मंत्री राम शिंदे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास तथा मेंढी व शेळी महामंडळ असे नामकरण करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी परवानगी दिली आहे. धनगर समाजाची लोकसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे तेथे चराई क्षेत्र राखीव ठेवण्यास मान्यता दिली आहे.
धनगर समाजाला आदिवासीच्या योजना लागू करण्यात आल्या असून आदिवासीच्या निधीस धक्का न लागू देता स्वतंत्र निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव:
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यावर एकमत या बैठकीत झाले. त्याची अधिसूचना येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात येणार असून रीतसर कार्यक्रम 6 मार्चला होणार आहे.
चौकट:
धनगर समाज शैक्षणिक प्रवाहात येणार: महादेव जानकर
आदिवासी समाजाच्या योजना धनगर समाजाला लागू केल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाची प्रगती होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.