येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत समोरा-समोर या कोण संपते पाहू; धनंजय मुंडेंचा बहिण पंकजावर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा – माझी बहिण कुठल्यातरी सभेत म्हणल्या की, राष्ट्रवादीचा समारोप करू, पण त्यांना कोणीतरी सांगा की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी संपवणे म्हणजे चिक्की खाण्या इतके सोप आहे का? असा टोला मुंडे यांनी पंकजा यांना लगावला. हिमंत असेल तर येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत समोर-समोर या कोण संपते पाहू, असे म्हणत धनंजय मुंडेंचा बहिण पंकजावर निशाणा साधला.

मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याला गेल्या काही वर्षात काही लोकांनी भकास करण्याचे काम केले आहे. पाच वर्षात बीड जिल्ह्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत ७८ सिंचन प्रकल्प प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प मार्गी लागले असते तर ऊसतोड मजूरांची संख्या निश्चीत कमी झाली असती. ज्या परळीच्या थर्मलवर 10 हजार लोकांचे पोट आहे ते थर्मल बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

पालकमंत्री या नात्याने त्यांचे लक्ष आहे का? बीड जिल्ह्याला भावनिक करायचे स्व. गोपीनाथाराव मुंडे यांचे नाव घ्यायचे हे आता चालणार नाही असे म्हणत त्यांनी विद्यामान खासदार प्रितमताई मुंडे यांच्यावरह टीका केली.

निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आणि शेवटही झाला. सत्तेची सुरुवात ज्या परळीतून झाली त्याच परळीतून मस्तवाल सत्तेचा समारोप होईल. भावनिक करण्याचे राजकारण आता नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान खासदार प्रितम मुंडे याच्यावर निशाना साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित आहेत.