थोडे दिवस कळ काढा, देशभरातून भाजपचा वास काढून टाकू- धनंजय मुंडे

पुणे: हल्लाबोल यात्रेदरम्यान धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून “राष्ट्रवादीची सभा विस्कळीत व्हावी म्हणून कामशेत ग्रामपंचायतने ड्रेनेजची लाईन खुली केली आहे. जेणेकरून सभेच्या ठिकाणी वास येईल व लोक सभेला येणार नाही. भाजपने राजकारणाची खालची पातळी गाठली आहे. थोडे दिवस कळ काढा, देशभरातून भाजपचा वास काढून टाकू” असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी मावळ येथे बोलतांना केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले, “नांदेडच्या एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचले. यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. ही सध्याची परिस्थिती आहे. ही राज्यातील शोकांतिका आहे” हल्लाबोल यात्रेचा आज दहावा दिवस असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.