fbpx

…तर छत्रपती शिवाजी महाराज संघाचेच होते! असा प्रचार यांनी केला असता- धनंजय मुंडे

dhananjay munde vr rss

कोल्हापूर: महान क्रांतिकारक राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. धनंजय मुंडे यांनी या दाव्याचा जोरदार समाचार घेतला. धनंजय मुंडे म्हणाले, बरं झालं संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर छत्रपतीही संघाचे होते असा प्रचार यांनी केला असता.

धनंजय मुंडे यांनी संघावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, संघाच्या कार्यालयात कधी तिरंगा फडकवला नाही, त्याच संस्थेकडून चुकीचा प्रचार होत आहे. बरं झालं संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर छत्रपतीही संघाचे होते असा प्रचार यांनी केला असता. हा अपप्रचार आम्ही किती दिवस सहन करायचा? हे थांबवायचे आहे म्हणून हा हल्लाबोल आहे. काल एका वाहिनीवर शहीद राजगुरू हे संघाचे सदस्य होते यावर चर्चा सुरू होती. यांना काय बोलावे तेच कळत नाही. डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे संघाचे होते असे प्रचार संघातर्फे केले जात आहेत. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता म्हणून हा असा प्रचार केला जात आहे. असे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, आपल्या देशात सत्ताधारी मूळ मुद्दे बाजूला ठेऊन विविध गोष्टींवर चर्चा रंगवत आहेत. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावबदलाची चर्चा सुरू आहे. ज्या बाबासाहेबांचा आपण आदर करतो त्यांचे नाव आता भीमराव रामजी आंबेडकर घ्या असा जीआर युपी सरकारने काढला आहे.

नरेंद्र सेहगल यांनी भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता या पुस्तकात संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे नागपूर येथील मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे. मात्र राजगुरूंच्या वंशजांनी हे दावे फेटाळले आहेत.

नेमकं काय म्हणाले सेहगल पुस्तकात ?

१. राजगुरु हे नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक होते.
२. राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.
३. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय भैय्याजी दनः यांच्या घरात केली.
४. नागपुरात येऊन राजगुरु डॉक्टर हेडगेवारांना भेटले.
५. इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर ते लाहोर सोडून पळाले.