पंकजा मुंडेच्या साखर कारखान्यात जाण्यास धनंजय मुंडेना मज्जाव

बीड: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून १५ कामगार भाजल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेले विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना कारखान्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संपत पाळवदे यांनी धनंजय मुंडेंना रोखलं. मात्र ‘आपण कारखान्याचे सभासद असल्यामुळे आत जाण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं’ सांगितल्यावर त्यांना आत सोडण्यात आले.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचा आकडा पाचवर पोहचला आहे.

दरम्यान काल पंकजा मुंडे यांनी जखमींच्या कुटुंबियांची भेट घेवून विचारपूस केली होती. यावेळी दुर्घटनेत मयत कर्मचाऱ्यांना कारखाना व्यवस्थापन मार्फत तीन लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी दोन लाख रुपये तसेच मुंडे कुटुंबा तर्फे वैयक्तिक प्रत्येकी एक लाख रुपये व कुटुंबातील एक व्यक्तीस कारखान्यात नोकरी देण्याचे जाहीर केले. तसेच जखमी व्यक्तींचा उपचाराचा पूर्ण खर्च उचलणार असून मुंडे कुटुंबातर्फे प्रत्येकी एक लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जखमींना प्रत्येकी पन्नास हजार व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्या मार्फत प्रत्येकी पंचवीस हजार देण्याचे जाहीर केले.