fbpx

‘माझी लढाई व्यक्ती विरूध्द नव्हे तर परळीच्या माणसांच्या भल्यासाठी’

टीम महाराष्ट्र देशा : माझी लढाई ही कोणत्याही एका व्यक्ती विरूध्द नव्हे तर परळीतल्या आणि माझ्या मातीतल्या माणसांच्या भल्यासाठीची लढाई आहे, हा संघर्ष सुरू आहे, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी माझ्यासारख्या भूमिपुत्राला यश मिळवून देण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या असे आवाहन परळीतील कार्यक्रमात केले आहे.

यावेळी धनंजय मुंडे यांनी परळीच्या विकासाबाबत भाष्य केले. तसेच उपस्थितांकडून जनमताचा कौल घेतला. तर या लेकाला कधी आशिर्वाद देणार ? असा प्रश्न विचारत त्यांनी उपस्थितांच्या भावनेला हात घातला. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही परळीत उद्योग आला नाही. साधी परळी-मुंबई रेल्वे सुरू झाली नाही. रेल्वे स्टेशनचे उत्पन्न मागील 6 वर्षांपासून 400 कोटींवरून 64 कोटींवर आले, या सर्व गोष्टींचा परळीकरांच्या आर्थिक जीवनाशी संबंध असताना याचा विचार करायला हवा. केवळ रस्ते, वीज, नाल्या, पाणी म्हणजेच विकास नव्हे तर माणसाची आर्थिक उन्नती करणे हे आपले स्वप्न आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदार संघात भाजप राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच याही विधानसभेला मुंडे बंधू भगिनी आमने सामने येणार आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांनी निवडणुका जाहीर होण्या अगोदरचं मतदारसंघात प्रचाराला सुरवात केली आहे.