आता धनंजय मुंडे यांचा खड्ड्यांसह सेल्फी…

बीड : सेल्फी विथ खड्डे या खा. सुप्रिया सुळे यांच्या मोहिमेवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरात ट्विटरवाद रंगला असताना या वादात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खड्ड्यांसह सेल्फी काढला आहे.

औरंगाबाद येथे चंद्रकांत पाटील यांनी मराठवाडयातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्‍त करणार अशी घोषणा केली होती. तोपर्यंत खड्डे बुजले नाहीत तर १६ डिसेंबर रोजी परत सेल्फी काढून पाठवू असेही मुंंडे यांनी जाहिर केले आहे. मुंडे यांनी अंबेजोगाई ते अहमदपूर या रस्त्यावरून उदगिरकडे जात असताना खड्डयांसोबत सेल्फी काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरद्वारे पाठवल्या आहेत.

राज्यात ब-याच ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली माती, मुरूम टाकण्याचे प्रकार सुरू असून त्या विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठी मोहीम उघडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली.दरम्यान आपण केवळ एका रस्त्याचा फोटो बांधकाम मंत्री यांना पाठवला आहे, हा केवळ एका रस्त्याचा प्रश्न नसून संपूर्ण राज्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. चंद्रकांत दादा यांनी १५ डिसेंबरपर्यंत खड्डे बुजवण्याची घोषणा केली आहे. आम्ही त्यांना १५ डिसेंबरची मुदत देत असून या कालावधीत खड्डे न बुजल्यास दादांना घेऊन जाऊन त्यांना त्या वेळी सेल्फी नाही तर प्रत्यक्ष खड्डा दाखवू, असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे

 Loading…
Loading...