स्व.मुंडे साहेब असते तर त्यांनी वा रे पठ्या! म्हणुन पाठ थोपटली असती- धनंजय मुंडे

परळी: धनंजय मुंडे यांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर २०१८ पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार देवुन गौरव केल्याबद्दल काल परळी शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, स्व.अण्णा, स्व.मुंडे साहेब असते तर त्यांची ही छाती अभिमानाने फुलुन गेली असती. वा रे पठ्या! म्हणुन त्यांनी ही पाठ थोपटली असती. असे बोलतांना धनंजय मुंडे यांना गहिवरून आले होते.

नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य सत्कार, मानपत्र देऊन गौरविण्यात आल्यानंतर बोलतांना धनंजय मुंडे अतिशय भावुक झाले होते. मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी संधी दिली नसती तर आज मी या ठिकाणी उभा दिसलो नसतो. असे सांगत त्यांच्या बद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सत्ता आल्यानंतर परळीचे संपुर्ण रूप मला बदलुन टाकायचे आहे. केवळ परळीचाच नव्हे तर संपुर्ण बीड जिल्ह्याचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. परळीच्या माणसाची मोठी शक्ती आणि ताकद आहे. या ताकदीच्या बळावरच मी आज या पदावर पोहोचलो आहे. मला राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. त्यासाठी तुम्ही साथ आणि आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.

धनंजय मुंडे यांच्या चाहत्यांनी महाराष्ट्रीयन ऑफ द एयर २०१८ पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परळी या जन्मभूमीत सत्कार सोहळा संपन्न झाला. आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणबाई मुंडे प्रथमच जाहिर कार्यक्रमात उपस्थित होत्या. विशेष म्हणजे त्यांनी सामान्यांमध्ये बसुन आपल्या मुलाचे कौतुक पाहिले ते पाहताना त्यांचे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले होते.