fbpx

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर या याचिकेवर येत्या १५ जुलैला सुनावणी होणार आहे. राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी बरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगतीचे आदेश दिले होते. त्यामुळे फड यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

दरम्यान जगमित्र साखर कारखान्यासाठी बेकायदेशीरपणे इनामी जमीन खरेदी केल्याचे हे प्रकरण आहे. राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीनुसार २०११ मध्ये जगमित्र शुगर मिल्स प्रा.लि.साठी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पूस येथील जमीन खरेदी केली होती. ही जमीन बेलकुंडी मठाला इनाम दिलेली होती. मठाचे पूर्वीचे महंत रणजित व्यंकागिरी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांनी जमिनीवर स्वत:च्या मालकीची परस्पर नोंद करून घेऊन त्या जमिनी विकल्या. धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे सदर जमिनी खरेदी केल्या आणि राजकीय वजन वापरत अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून सदर जमिनीचे खरेदीखत, फेरफार आणि एनए करून घेतला. खरेदीखत करताना कायदेशीर बाबींच्या पूर्तता करण्यात आल्या नाहीत. सध्या धनंजय मुंडे यांच्यावर कलम 420, 468, 465, 464, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 14 आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.