आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला

टीम महाराष्ट्र देशा : दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत, तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. उद्या दि. 17 जुलैला दुपारी 12 च्या सुमारास ढाले यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजा ढाले यांच्या निधनाने सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील राजा ढाले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दलित पँथर चे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजा ढाले यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर खासकरून दलित पँथर चे कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील ढाले यांच्या निधनाचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे.