बीडसह ‘त्या’ 10 जिल्ह्यांचा पिकविमा योजनेत समावेश करा, धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

dhananjay munde

मुंबई : बीड व इतर 9 जिल्ह्यात शेतकरी पीकविमा योजनेच्या निविदा कोणत्याही विमा कम्पनीने न भरल्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे सदर कंपन्यांना निर्देशित करून शेतकऱ्यांचे पिकविमे तात्काळ भरून घ्यावेत व शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

सततच्या दुष्काळाने सतावलेल्या शेतकऱ्याला पीकविमा थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळवून देतो. २०१९-२०च्या रब्बी हंगामात मात्र बीडसह लातूर, हिंगोली, वाशीम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा , सोलापूर आदी जिल्ह्यात कोणत्याही विमा कम्पनीने विविध कारणे देत पिकविम्याच्या निविदा न भरल्याने येथील शेतकऱ्याला पिकविम्यापासून वंचित राहावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पीकविमा हफ्ता भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बीडसह अन्य उपेक्षित जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात असून विमा प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अगोदर कोरड्या आणि आता शेवटी ओला दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पिकविम्यासारख्या योजनेतून त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत असतो, त्यापासून शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून याबाबत तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करण्याची अपेक्षा श्री. मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या