‘उद्धवजी, मग आता तुम्ही मुजरा करायला का गेलात?’ – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शाहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास आज गुजरातच्या गांधीनगर मध्ये उपस्थित होते.  उद्धव ठाकरेंनी लावलेल्या या उपस्थितीवर मात्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले,” यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अफजल खानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत, असं वक्तव्य अमित शहांबाबत केलं होतं. मग आता असं नेमकं काय झालं, अशी कोणती ईडीची पीडा टाळण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब अफजल खानाच्या शामियान्या मध्ये अफझलखानाला मुजरा करायला जात आहेत, याचं उत्तर महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांच्याकडून मागत आहे,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

२०१४ मध्ये शिवसेना भाजपची २५ वर्षांची युती तुटल्यानंतर उद्धव यांनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही शिवसेना केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये कायम होती. तसेच तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. अमित शहांनीही पटक देगें म्हणत शिवसेनेवर शरसंधान साधलं होतं. या सर्व मुद्यांवरून धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

दरम्यान, सध्या राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याआधी अमित शह यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांची भव्य सभा झाली. अर्ज दाखल करण्याआधी अमित शाह आपल्या मतदारसंघात रोड शोही केला.