अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ? – धनंजय मुंडे

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयाची फसवणूक सुरू आहे. नाणार भूसंपादनाबाबत 18 मे 2017 ची अधिसूचना रद्द करण्याची सुभाष देसाई यांची घोषणा म्हणजे फार्स आहे. अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ? ही कारवाई झाली आहे का असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

तर दिल्ली मध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे माहित नाही पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची जनतेच्या मनातून पत मात्र उतरली आहे. असा टोला सुद्धा धनंजय मुंडे यांनी भाजप आणि सेनेला लगावला आहे.

दरम्यान, नाणार येथे झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेत उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली होती मात्र या घोषणेच्या काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि सुभाष देसाई यांना तोंडघसी पाडलं आहे.

नाणार जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झालेली नाही, सुभाष देसाईंची घोषणा त्यांचं व्यक्तीगत मत आहे, सरकारचं नाही अस स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दणका दिला आहे. नाणार जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त हाय पॉवर कमिटीला आहे, मंत्र्यांना नाही. कोकणाचं हित विचारात घेऊन सरकार निर्णय घेणार असल्याच सांगत शिवसेनेच्या घोषणेला मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली आहे.