भाजपच्या मंत्र्यांनीही लाजा सोडल्या; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

dhananjay munde

पुणे: राज्यातील सरकार भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. ९० हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. यांची न्यायालयीन चौकशी करा. आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या. असा थेट हल्ला धनंजय मुंडे यांनी भाजपवर चढवला.

हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. सध्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दौरा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीची खरी ताकद पुण्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सभा कशा होतील याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती. आजच्या सभेची गर्दी पाहता राष्ट्रवादीच्या सामर्थ्याची प्रचीती आली. असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

भाजपच्या महामेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राष्ट्रवादीची दहशत दिसली. ज्यावेळी त्यांनी पवार साहेबांवर टीका केली तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना पाणी प्यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांच्या वयाचे भान तरी ठेवायला हवे होते. असे बोलत त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. भाजप संघाच्या माध्यमातून देशात नवे प्रश्न उपस्थित करत आहे. मूलभूत प्रश्नांना बगल देत भलत्याच चर्चा रंगवत आहेत. या सरकारला घरी बसवल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.