… तर मी स्वतः अर्ज भरण्यासाठी त्यांच्या स्वागताला गेलो असतो : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्ष प्रचारालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान आज पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे या आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून उपहासात्मक भाष्य करत प्रितम मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

भाजपचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारानी कार्यकर्त्यांसह रेल्वेने बीडला उमेदवारी अर्ज दाखल कारायला येणार असं आश्वासन बीडच्या जनतेला पाच वर्षापूर्वी दिलं होतं. त्याचं काय झालं? खरंच जर दिलेलं आश्वासन पूर्ण केलं असतं तर आज मी स्वत: त्यांच्या स्वागताला बीड रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहिलो असतो. अस मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान विद्यामान खासदार डाॅ.प्रीतम मुंडे आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी यशःश्री निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे व लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी आई प्रज्ञाताई मुंडे, अमित पालवे, बहीण यशश्री मुंडे सह आमदार.आर.टी देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.