… तर मी जाहीर फाशी घेईल : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसेच दौरे, गाठीभेटी, सभा यांसारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडे हे परभणीमध्ये कार्यकर्ते मेळाव्यादरम्यान बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, भाजप सरकारमधील 22 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी विधान परिषदेत दिले आहेत. पण दुर्देव असं आहे की त्यातील एका मंत्र्यावर देखील कारवाई झालेली नाही. माझे पुरावे खोटे निघाले तर मी जाहीर फाशी घेईन, असे मुंडे यावेळी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना मुंडे म्हणाले, नागव्याचे नवग्रह बलवान असतात, त्यामुळे ईडीची भीती आम्हाला दाखवू नका, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी भाजपच्या मंडळींवर टीका करत हा पक्ष मातीत गाडल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील फडणवीसांवर शाब्दिक निशाणा साधला. मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असं म्हणत महाजनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर ही वेळ आली नसती, असे म्हणत कोल्हे यांनी फडणवीसांवर शाब्दिक निशाणा साधला.