fbpx

३३ कोटी झाडांपैकी एकतरी झाड कुठे दिसलं का – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेमधूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

ते म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री सांगतात, आम्ही शेतकऱ्यांना विहिरी बांधून दिल्या, शेततळी दिली, ३३ कोटी झाडे लावली, या ३३ कोटी झाडांपैकी एकतरी झाड कुठे दिसलं का? जलयुक्त शिवाराचं काय झालं? असे सवाल मुंडे यांनी उपस्थित केले आहेत. ते पाथरी येथे बोलत होते.

तसेच  ते पुढे म्हणाले की , शिवस्वराज्य यात्रेतून महाराजांच्या विचारांचे, अठरापगड जातींचे राज्य स्थापन करण्याची भूमिका मांडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा तर भाजपकडून महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे