पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था गजनी मधल्या आमीर खान सारखी – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे पोहोचली आहे. कोकणात आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगडमधील सभेतही तुफान टोलेबाजी केली.

नरेंद्र मोदींची २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमीर खानची आठवण येते. मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. अहो, इथे विक्रमगडच्या चौका-चौकातही मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा होत असेल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा समारोपाप्रसंगी मोदी म्हणाले की, आम्हाला गर्व आहे की आम्ही भ्रष्टाचार मुक्त शासन दिले. मोदीजी मग व्यापम, ललित गेट, राफेल काय आहे? महाराष्ट्रातील मंत्र्यांनी तर जनतेला कोट्यावधी रुपयांनी लुटले. कुठे गेला तुमचा भ्रष्टाचार मुक्त भारत ? असा हल्ला धनंजय मुंडे यांनी चढवला.

तर मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच २०१४ सालची भाषणं ऐकवली तर मोदी स्वतःच प्रचारासाठी बाहेर पडणार नाही. २०१४ सालच्या लाटेत देशाचं, राज्याचं प्रचंड नुकसान झालंय. मात्र आता यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. अस देखील ते म्हणाले.

आदिवासी विकास मंत्र्यांचा मतदारसंघ असूनही येथे आदिवासी बांधवांचा विकास कुठे दिसला नाही. मी याआधीही या परिसरास भेट दिली होती. आजही परिस्थिती जैसे थे आहे. आपल्या आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातच सर्वात जास्त कुपोषित बालकांची संख्या आहे हे राज्याचं दुर्दैव. कुपोषित बालकांना मिळणाऱ्या साहित्यात घोटाळा करणाऱ्या यांना जर लहान लेकरांचे रडणे ऐकू येत नसेल तर मी म्हणतो यांचा मेंदूच कुपोषित झालाय. अस मुंडे यांना आदिवासी विकास मंत्र्यांचा देखील खरपूस समाचार घेतला.